
स्नेहमिलनातून हिवरीत होळी साजरी सामाजिक एकोप्याचे घडले दर्शन
‘चेहऱ्यावर रंग लावण्यापेक्षा आयुष्यात रंग भरण्यासाठी प्रत्यक्ष गाठीभेटी महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय नंदगवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे ओंकार चेके यांनी केले.मंगळवारी त्यांनी आपल्या संकल्पतेतून आगळीवेगळी होळी साजरी केली.त्यांनी आपल्या हिवरी येथील निवासस्थानी स्नेहमिलन ठेऊन पर्यावरणपूरक अशी रंगपंचमी साजरी केली.यासाठी घाटंजी, यवतमाळ, राळेगाव व आर्णी तालुक्यातील पदाधिकारी, समाजबांधव तसेच आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळवड हा स्नेह, प्रेम आणि ऐक्य वृद्धिंगत करणारा सण आहे. पण आज डिजिटल क्रांतीमुळे माणसे एकमेकांपासून दुरावली जात आहे. एकमेकांच्या प्रत्यक्ष भेटी घडाव्या एकमेकांचे आयुष्य कळावे त्यातून आयुष्याला सहज करता यावे या उद्देशातून चेके यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक रंगांचा वापर न करता नैसर्गिक व साध्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी उपस्थितांचे स्वागत करून समाजातील एकोपा व संघटनबांधणीचे महत्त्व अधोरेखित केले. समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून विचारांची देवाणघेवाणही करण्यात आली.कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने झाला. या अभिनव उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपल्या गेली असून डिजिटल क्रांतीच्या युगात माणुसकीच्या नात्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.डिजिटल युगात आपुलकी हरविली आजच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात प्रत्यक्ष संवाद कमी झाल्याने आपुलकी हरवत चालली आहे. मात्र प्रत्यक्ष गाठीभेटींमधून निर्माण होणारा जिव्हाळा आणि आपुलकी अधिक महत्त्वाची ठरते. रंगपंचमीच्या निमित्ताने केवळ स्मार्टफोनवर शुभेच्छा न देता प्रत्यक्ष भेटीतून सण साजरा करण्याचा उपक्रम येथे राबविला गेला.यामुळे सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी बोलून दाखविली.
