
यवतमाळ : विद्या प्रसारक मंडळाद्वारे संचालित स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ, यवतमाळ येथे महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३’ (POSH Act) या विषयावर आधारित या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.या कार्यशाळेत प्रमुख वक्त्या म्हणून ‘सखी वन स्टॉप सेंटर’ च्या केसवर्कर ॲड. श्वेता लिचडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सेंटरच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती देताना संकटकाळात महिलांनी कोणत्या संस्थांकडून व कशा प्रकारे मदत घ्यावी, याचे सविस्तर विवेचन केले. त्यानंतर कायदेशीर सल्लागार ॲड. सुप्रिया रोकडे यांनी ‘POSH Act 2013’ मधील विविध तरतुदी, कामाच्या ठिकाणी महिलांच्या संरक्षणासाठी असलेली कायदेशीर यंत्रणा तसेच तक्रार निवारण प्रक्रियेबाबत विस्तृत तांत्रिक व कायदेशीर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. वैशाली फाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना कायद्याचे भान व ज्ञान असणे ही काळाची गरज असल्याचे सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजेश मुणोत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा प्रा. पल्लवी हांडे यांनी केले व समितीच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नंदिनी आदमाने यांनी केले, तर प्रा. वंदना पसारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यशाळेला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व स्तुत्य ठरला.
