
हिवरी प्रतिनिधी
यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी केबल चोरी प्रकरणाचा छडा लावत तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेला मुद्देमाल व मोटारसायकल असा एकूण ५७ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मडकोना येथे ८ मे २०२६ ते १२ मे २०२६ दरम्यान अज्ञात आरोपींनी जमिनीपासून टॉवरच्या टोकापर्यंत असलेली आर.आर.ए. पॉवर कॉपरची काळ्या रंगाची अंदाजे ३०० मीटर केबल चोरी केली होती. चोरी गेलेल्या केबलची किंमत सुमारे ४७ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी दीपक ठोरे (वय २०, रा. बागमारे लेआऊट, पिंपळगाव), सर्वेश उर्फ लकी संजय बसोड (वय २२, रा. बागमारे लेआऊट, पिंपळगाव) व नयन रमेश भोयर (वय २४, रा. सूर्यभी नगर, पिंपळगाव) यांना अटक केली.
आरोपींकडून चोरी गेलेला माल व मोटारसायकल असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच आरोपींनी पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण हद्दीत आणखी चोरी केल्याची कबुली दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार सुनील नाईक यांच्या नेतृत्वात बिट जमादार कैलास लोढे, संजय राठोड, शंकर पेंढार व चालक पोलिस कॉन्स्टेबल अविनाश वाघाडे यांनी केली.
