
प्रतिनिधी यवतमाळ
शहरातील दत्त चौक, अमराईपुरा परिसरातील नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर एका व्यापाऱ्याने गोडाऊनसाठी बेकायदेशीरपणे पक्के बांधकाम सुरू केल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी नगरपरिषदेचे मोठे विसर्जन टाके असून, गणेशोत्सव, दुर्गादेवी उत्सव तसेच शारदा देवी उत्सवादरम्यान शहरातील शेकडो मूर्तींचे विसर्जन याच टाक्यात केले जाते.मिळालेल्या माहितीनुसार, टाक्यालगत असलेल्या खुल्या जागेवर संबंधित व्यापाऱ्याने विटा, रेती आणि सिमेंटचा वापर करून पक्के बांधकाम सुरू केले आहे. या बांधकामामुळे परिसरातील व्यापारी लाईनच्या भिंतींना धक्का पोहोचत असून, बांधकामासाठी वापरण्यात येणारे पाणी शेजारील किराणा दुकान व घरांमध्ये शिरत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यामुळे रहिवासी व व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या प्रकरणी स्व. पी. एल. शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ, सामाजिक कार्यकर्ते, भाजप शहर उपाध्यक्ष करण सोळंकी तसेच स्थानिक व्यापाऱ्यांनी लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत नगरसेवक योगेश भावे यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना दिल्या.त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने संबंधित बांधकामधारकास नोटीस बजावली. मात्र, संबंधितांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्याने ती नोटीस बांधकामाच्या भिंतीवर लावण्यात आली. नोटीस दिल्यावरही अधिकाऱ्याला न जुमानता बांधकाम सुरूच ठेवले या वरून या अतिक्रमण धारकान कडून राजकीय पाठबळ आहे का?,दरम्यान, हे अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.नगरपरिषद प्रशासन या अनधिकृत बांधकामाविरोधात पुढे कोणती कारवाई करणार, याकडे परिसरातील व्यापारी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
