
प्रतिनिधीयवतमाळ
पत्रकारिता क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून सातत्याने कार्यरत राहून जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारे पत्रकार ओंकार चेके यांना ‘भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम समाज रत्न राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुणे येथे 11 एप्रिल रोजी चेके यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.चेके यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून विविध गैरप्रकार उघडकीस आणत त्यावर आळा घालण्याचे काम केले आहे. तसेच ग्रामीण पत्रकारांचे संघटन उभारून त्यांच्या हक्कांसाठी आंदोलन, धरणे आणि मोर्चांच्या माध्यमातून शासनापर्यंत आवाज पोहोचवण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले.पत्रकारितेबरोबरच त्यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. नागपूर–तुळजापूर महामार्गावरील हिवरी परिसरात होणाऱ्या अपघातांमध्ये ते तातडीने घटनास्थळी पोहोचून गंभीर जखमींना स्वखर्चाने रुग्णालयात दाखल करतात. त्यांच्या या तत्पर सेवेमुळे आतापर्यंत सुमारे 150 चे वर रुग्ण मृत्यूच्या दारातून परत आले असून अनेकांचे प्राण वाचले आहेत.सन 1990 पासून हे कार्य ते सातत्याने करत आहे.कोरोना काळात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत 80 गरजू कुटुंबांना घरपोच टिफीन व अन्नपुरवठा केला. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी व नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कोरोना बाधितांना मदत, तसेच विविध वॉर्डमध्ये स्वच्छतेसाठी विशेष उपक्रम राबवले.त्यांच्या या कार्याची दखल घेत पुणे येथील ‘एडी फाउंडेशन’तर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ११ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजता सावित्रीबाई फुले सभागृह, पुणे येथे संस्थापक अशोक गोरड यांच्या हस्ते चेके यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
