
यवतमाळ प्रतिनिधी
शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. जुही जयंतकुमार शेटे पुर्वाश्रमिच्या रुचिरा कापसे यांना नुकतीच आचार्य (Doctor of Philosophy – Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.डॉ. जुही शेटे-कापसे यांनी “महात्मा बसवेश्वर यांच्यावर लिहिलेल्या ललित साहित्याचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. कादंबरी, नाटक, कथा, ओवी, काव्य तसेच पोवाडे या ललित वाड्मयाच्या प्रकारांच्या संदर्भातून त्यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचे सखोल विश्लेषण केले आहे. त्यांच्या संशोधनातून बसवेश्वरांच्या सामाजिक, धार्मिक व मानवतावादी विचारांचे साहित्यिक प्रतिबिंब प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले आहे.दीर्घकालीन अभ्यास, सातत्यपूर्ण परिश्रम आणि संशोधननिष्ठ दृष्टीकोन यांच्या जोरावर त्यांनी आपले संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यांच्या प्रबंधाला परीक्षकांकडून विशेष प्रशंसा मिळाली असून साहित्य अभ्यासकांसाठी हा संशोधनग्रंथ मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.डॉ. जुही जयंतकुमार शेटे-कापसे या शिक्षण क्षेत्राशी निगडित असून त्या नगर परिषद, दारव्हा येथे उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. २ येथे शिक्षिका म्हणुन कार्यरत आहेत, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आणि शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या या यशामुळे विद्यार्थी, सहकारी शिक्षक, मित्रपरिवार तसेच कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांना हा प्रबंध पुर्ण करण्यासाठी डाॅ. माधुरी भटकर या मार्गदर्शक म्हणून लाभल्या तसेच डाॅ. अशोकराव मेनकुदळे, डाॅ. एकता शेटे, डाॅ. राधेशाम चौधरी आणि पती श्री. जयंतकुमार शेटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या उल्लेखनीय यशाबद्दल लिंगायत समाजासह, विविध शैक्षणिक व साहित्यिक संस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
