
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरायवतमाळ : सुसंस्कार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी VES च्या राज्यस्तरीय परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्ता, परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर दैदीप्यमान कामगिरी नोंदवित राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.Versatile Educare System (VES) या मुंबईस्थित संस्थेद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित परीक्षेतील शालेय निकाला आधारे राज्यस्तरीय परीक्षेसाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परीक्षा घेण्यात आली. सदर परिक्षेसाठी सुसंस्कार विद्या मंदिर शाळेतून ४० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. संपूर्ण राज्यातून एकूण ३२ शाळेचे पात्र विद्यार्थी या स्पर्धेला उपस्थित होते. स्पर्धेसाठी VES परीक्षेच्या माध्यमातून फॉनिक्स, अबॅकस, इंग्रजी व मराठी हस्ताक्षर सुधारणा, रुबिक क्यूब, आर्थिक साक्षरता (Financial Literacy), वैदिक गणित अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. उपस्थित ३२ शाळेच्या विद्यार्थ्यांमधून पूर्वप्राथमिक विभागातून सुसंस्कार विद्या मंदिर शाळेतील कु.आरोही भारत जोशी या विद्यार्थिनीने फॉनिक्स या विषयामधून दुसरा क्रमांक व कु.श्रीजा हर्षल इंगोले या विद्यार्थिनीने तिसरा क्रमांक पटकाविला, प्राथमिक विभागातून इयत्ता ५ वी ची आराध्या ओमप्रकाश चव्हाण या विद्यार्थिनीने मराठी शुद्धलेखन या विषयातून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच आर्थिक साक्षरता विषयातून इयत्ता ७ वी च्या चिराग योगेश चेके या विद्यार्थ्याने दुसरा क्रमांक पटकाविला.अशाप्रकारे सर्व श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांना VES संस्थेद्वारे मोस्ट ट्रान्सफॉर्मेड स्टुडन्ट अवॉर्ड ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. त्याबरोबरच आर्थिक साक्षरता विषयांतर्गत शाळेला ‘बँक फॉर्मेशन अवॉर्ड’ तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका के.उषा यांना ‘मोस्ट स्किलड अवॉर्ड’ देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेला मिळालेल्या दैदिप्यमान यशाबद्दल पालकांकडुन आणि सुसंस्कार बहुउद्देशिय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.हषर्वर्धन बोरा,उपाध्यक्ष सुनिल गुगलिया, सचिव श्री.संजय कोचे,सदस्य प्रविण लुणावत,गणेश गुप्ता,राजेश गुप्ता,मनोज लुणावत ह्यांचे द्वारा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शाळेच्या मुख्याध्यापिका व प्रभारी शिक्षकांचे भरभरून कौतुक केले तसेच पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
