
प्रतिनिध यवतमाळ
यवतमाळ शहरातील रेणुका मंगल कार्यालयाजवळील घोडेराव चौक परिसरात बुधवारी रात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास खुनाची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सचिन राठोड उर्फ “येडा” हा पाटील इंटरप्रायझेस नावाच्या सिझिंग एजन्सीसाठी काम करीत होता. संबंधित एजन्सी पुणे येथील असून, फायनान्स थकित असलेली वाहने जप्त करून कंपनीच्या यार्डमध्ये जमा करण्याचे काम काही व्यक्तींना सोपविण्यात आले होते.मात्र, हे काम पुढे स्थानिक गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींमार्फत करण्यात येत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. दरम्यान, सचिन राठोड याने एका फायनान्स थकित दुचाकी वाहनाला अडविले असता वाहनचालक आणि त्याच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने दुचाकीस्वारांनी सचिनवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या सचिनचा घटनास्थळीच मृत्यू झाला.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच सिझिंगच्या नावाखाली धामणगाव रोड व धामणगाव बायपास परिसरात काही टोळ्या सक्रिय असल्याचेही समोर येत आहे. या कामात शहरातील कुख्यात गुन्हेगारांचा सहभाग असल्याचीही चर्चा रंगली आहे.या टोळी वरील पोलिसांनी अंकुश लावणे गरजेचे आहे .पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
