
यवतमाळ प्रतिनिधी
येथील सारस्वत चौकातील हॉटेल ट्यूलिप ग्रीन गार्डनच्या सभागृहात आपले सरकार सेवा केंद्र हक्क संरक्षण असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या वतीने प्रथम सर्वसाधारण सभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सभेला जिल्हाभरातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सभेच्या प्रारंभी संघटनेच्या उद्दिष्टांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी केंद्र चालकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक अडचणी, प्रशासकीय स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्या तसेच केंद्र चालकांच्या हक्कांचे संरक्षण या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.या सभेस व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष यासीन नागाणी, उपाध्यक्ष धनराज पवार, सचिव विशाल मुरादे, तसेच सचिन घाडगे, उदय पुंडे, प्रवीण भोयर, मनोज चौधरी, सोनाली जब्बलवार, सचिन गुल्हाने, रविराज ठाकरे आणि किशोर जयस्वाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.केंद्र चालकांनी एकजुटीने काम केल्यास त्यांच्या विविध समस्या लवकरात लवकर मार्गी लागू शकतात, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच संघटनेची भूमिका ही शासनविरोधी नसून शासनासोबत समन्वय साधत VLE (Village Level Entrepreneur) यांच्या समस्या सोडवण्याची असल्याचे स्पष्ट करण्यात आले.भविष्यात संघटनेची व्याप्ती वाढवणे आणि शासनाकडे प्रलंबित प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणे, यावर सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किशोर जयस्वाल यांनी केले. या सभेमुळे जिल्ह्यातील केंद्र चालकांमध्ये नवचैतन्य व उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
