
प्रतिनिधी
मानवतेच्या सेवेत कार्य करताना काही क्षण असे येतात, जे इतिहास बनतात… जे केवळ एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलत नाहीत, तर समाजाला माणुसकीची खरी ओळख करून देतात.नंददीप फाउंडेशनच्या ३५ बेघर मनोरुग्ण बांधवांच्या महा पुनर्वसन सोहळ्यात असा एक हृदय हेलावून टाकणारा चमत्कार घडला—बारा वर्षांपासून हरवलेल्या कलावतीबाई अखेर आपल्या घरट्यात परतल्या.गेल्या बारा वर्षांपासून कुटुंबापासून दूर, ओळख हरवलेली, मानसिक आजाराच्या अंधारात हरवलेली कलावतीबाई नियतीच्या कठोर प्रवासात भटकत राहिल्या. चार वर्षांपूर्वी जळगाव येथील मानव सेवा तीर्थ मधून त्यांना उपचारासाठी नंददीप फाउंडेशनच्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात दाखल करण्यात आले.मानसोपचार तज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम, डॉ. प्रवीण राखुंडे, डॉ. कविता बोरकर, डॉ. विजयकुमार, डॉ. प्रशांत कसारे आणि डॉ. सुरजुसे यांच्या सातत्यपूर्ण उपचारांमुळे, प्रेमळ संवादामुळे आणि सेवाभावामुळे कलावतीबाई हळूहळू मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सावरू लागल्या.उपचारानंतर त्यांनी केंद्रालाच आपले घर मानले. झाडू मारणे, स्वच्छता करणे, इतरांची मदत करणे—प्रत्येक काम त्या मनापासून करू लागल्या. साडी नेसणे आणि पदर डोक्यावर ठेवणे हा त्यांचा स्वाभिमान कधीच ढळला नाही.परंतु एक वेदना कायम होती—त्यांना स्वतःचे गाव, आपले घर आठवत नव्हते.नंददीपची टीम मात्र थांबली नाही…याच काळात नंददीप फाउंडेशनमध्ये सेवा देणारे पोलीस कर्तव्यदक्ष महेश कळसकर व नरेश पवार सर यांनीही अथक परिश्रम घेतले. त्यांनी दररोज कलावतीबाईंना व्यायाम, पी.टी. आणि योगाचे प्रशिक्षण दिले. शरीरासोबत मनही सुदृढ व्हावे या उद्देशाने घेतलेल्या त्या सत्रांमुळे कलावतीबाईंच्या स्मरणशक्तीत सकारात्मक बदल घडू लागला.आणि एक दिवस…पी.टी. योगाच्या सत्रादरम्यान अचानक त्यांनी आपल्या गावाबाबत काही महत्त्वाची माहिती सांगितली!तोच क्षण ठरला—आशेचा किरण.नंददीप टीमने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. अनेक प्रयत्न, धावपळ आणि तीन टप्प्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर १ मार्च रोजी नांदेड जिल्ह्यातील त्यांचे घर शोधण्यात यश आले.आणि मग आला तो आयुष्य बदलणारा क्षण…निशांत सायरे व नंददीपच्या सेवकांनी कलावतीबाईंना सुखरूप घरी पोहोचवले.दारात आईला पाहताच कुटुंबीयांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. मुलगा गोविंदा नंदू ब्रीदाळे आईला मिठी मारून रडू लागला. ज्या आईचा फोटो आठवण म्हणून घरात टांगण्यात आला होता, तीच आई आज प्रत्यक्ष दारात उभी होती…घरच्यांच्या ओठातून नकळत शब्द बाहेर पडले—*”नंददीप फाउंडेशन म्हणजे आमच्यासाठी भगवंताचे दैवी रूप आहे.”*होळीच्या पावन सणाच्या निमित्ताने कलावतीबाईंचे यशस्वी पुनर्वसन करत त्यांच्या आयुष्याला नवसंजीवनी मिळाली. ३५ बेघर मनोरुग्णांच्या पुनर्वसन सोहळ्यात घर मिळालेल्या सहा बांधवांमध्ये कलावतीबाईंचाही समावेश झाला.आज नंदिनी ताई आणि संदीप शिंदे यांच्या अथक सेवेमुळे समाजाने विसरलेल्या जीवांना पुन्हा कुटुंब, ओळख आणि सन्मान मिळत आहे. पुनर्वसनाचा वाढता आकडा हा केवळ संख्या नाही—तो मानवतेचा पुनर्जन्म आहे.बारा वर्षांचा वनवास संपला…आई पुन्हा आपल्या घरट्यात परतली…आणि मानवतेने मृत आशेलाही पुन्हा जीवन दिले.
