
मृत्यूच्या दारातून परतलेल्या राहुलची घरवापसीनंददीप फाउंडेशन ठरतआहे मनोरुणांसाठी वरदान ! ‘१६’ पुनर्वसन अभियानातून बेघर मनोरुग्णांचे कुटुंबाशी पुनर्मिलनयवतमाळ : प्रतिनिधीबेघर, निराधार व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना नवजीवन देण्याचे कार्य करणाऱ्या नंददीप फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेले “विजय-१६ पुनर्वसन अभियान” नुकतेच यशस्वीपणे पार पडले असून या अभियानांतर्गत तीन बेघर मनोरुग्णांना त्यांच्या मूळ गावी नेऊन पुनर्वसन करण्यात आले.यामध्ये राहुल व स्नेहल भरणे या दोघांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र तिसऱ्या एका मनोरुग्णाने सांगितलेल्या गावात पोहोचल्यानंतर त्यांचे घर अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. संपूर्ण घर उद्ध्वस्त झाल्याने संबंधित व्यक्तीस पुन्हा नंददीप फाउंडेशनच्या निवारा केंद्रात आणण्यात आले.मृत अवस्थेत असल्याची माहिती… पण सुरू होता श्वासमागील पावसाळ्यात यवतमाळ शहरातील बाजार परिसरात एक व्यक्ती मृत अवस्थेत पडल्याची माहिती नंददीप फाउंडेशनला प्राप्त झाली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर संबंधित व्यक्ती म्हणजे राहुल हा चार दिवस मुसळधार पावसात थंड पाण्यात पडून असल्याचे आढळले. त्याच्या शरीरावर गंभीर जखमा असून त्यामध्ये किडे पडलेले होते व परिस्थिती अत्यंत गंभीर होती.नंददीप फाउंडेशनचे संस्थापक संदीप शिंदे व सहकाऱ्यांनी तात्काळ त्याला उपचारासाठी दाखल केले. आदरणीय रामभाऊ शिरसकर, डॉ. प्रवीण राखुंडे व डॉ. कविता ते बोरकर यांच्या वैद्यकीय उपचारांमुळे तसेच सातत्यपूर्ण सेवेमुळे राहुलची प्रकृती हळूहळू सुधारत गेली. पुढे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांच्या उपचारानंतर राहुल पूर्णपणे बरा झाला.आई-मुलाचे भावनिक पुनर्मिलनराहुलची ओळख पटवून त्याला देवगाव येथील कुटुंबीयांपर्यंत सुरक्षित पोहोचविण्यात आले. वर्षानुवर्षे हरवलेला मुलगा अचानक समोर आल्याने आई भावूक झाली असून उपस्थितांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू तरळले. या पुनर्मिलनामुळे एका कुटुंबाला नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.स्वयंसेवकांचे विशेष योगदानसदर पुनर्वसन मोहिम यशस्वी करण्यासाठी नंददीप फाउंडेशनचे स्वयंसेवक निशांत सायरे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या कार्याचे संस्थेच्या वतीने कौतुक करण्यात आले.नंददीप फाउंडेशनतर्फे रस्त्यावर बेवारस अवस्थेत आढळणाऱ्या मनोरुग्णांना उपचार, निवारा व पुनर्वसनाची सेवा सातत्याने दिली जात असून ही सेवा प्रामुख्याने समाजातील दात्यांच्या सहकार्यावर चालत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
