
प्रतिनिधी
सध्या देशभरात वाढलेल्या महागाईचा फटका सर्वसामान्यांसह दूध उत्पादक शेतकरी व गवळी समाजालाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. पशुखाद्य (ढेप), चारा, औषधे, देखभाल व वाहतुकीच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने दूध उत्पादनातून योग्य उत्पन्न मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीतही दूधाला योग्य दर न मिळाल्याने गवळी समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रीय नंद गवळी समाज संघटना, जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने दूध व दह्याच्या दरवाढीबाबत ठोस भूमिका घेतली आहे. समाजाच्या हक्कासाठी व दूध व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी दरवाढ अत्यावश्यक असल्याचे मत संघटनेने व्यक्त केले आहे.याच पार्श्वभूमीवर दूध भाव वाढीबाबत सविस्तर चर्चा व निर्णय घेण्यासाठी दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ (बुधवार) रोजी शिनामाय मंदिर, यवतमाळ येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मोठ्या संख्येने दूध उत्पादक व समाजबांधव उपस्थित राहिले.बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की,दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ पासून — दुधाचा विक्री दर ₹७०/- प्रति लिटर दूध उत्पादकास देण्यात येणारा दर ₹६५/- प्रति लिटरअसा दर लागू करण्यात येईल.ढेपीचे वाढलेले दर, महाग चारा, औषधोपचार व वाहतुकीचा खर्च पाहता हा निर्णय अपरिहार्य असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. दूध उत्पादकांचा व्यवसाय टिकून राहावा व समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.या निर्णयाची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी सर्व दूध डेअरी चालक, दूध विक्रेते व संचालकांनी संघटनेला सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय नंद गवळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. ओंकार चेके यांनी केले आहे. “आपली एकजूट हीच आपली ताकद असून, समाजाच्या हक्कासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले.या निर्णयामुळे दूध उत्पादकांना दिलासा मिळेल व गवळी समाजाचा व्यवसाय भविष्यात अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.तर या बैठकी मध्ये श्री क्षेत्र जाळीचा देवास केशवराव चेके आणि गजानन चेके यांनी मोटार सायकल नि जाऊन केवळ दोनच दिवसात दर्शन करुन परतले त्या निमित्ताने पहेलवान अनिलभाऊ पांडे व नानाजी घाटोळ व राष्ट्रीय नंदगवळी समाज संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.या वेळी अनेक गवळी समाज बांधव उपस्थित होते.
