प्रतिनिधी चिंतामण घोडाम
चिखलवर्धा गावात खुलेआम अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गावात जुगार, मटका तसेच अवैध दारू विक्री सुरू असून त्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाल्याची चर्चा गावातील महिला गटामध्ये सुरू आहे. चिखलवर्धा हे गाव आदिवासी पेसा कायद्यांतर्गत येत असल्याने येथील सामाजिक व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या अवैध धंद्यांमुळे अनेक नागरिकांचे आर्थिक व सामाजिक नुकसान झाले असून गावातील तरुण पिढीही व्यसनाधीनतेच्या विळख्यात सापडत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून या अवैध व्यवसायांना अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याचे आरोपही महिला गटाकडून केले जात आहेत.चिखलवर्धा गाव हे पारवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून, अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावातील महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलीस प्रशासन व इतर संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. अवैध धंद्यांविरोधात तातडीने कारवाई करून गावातील सामाजिक वातावरण सुरक्षित व व्यसनमुक्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
