
प्रतिनिधी यवतमाळ
आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, हिवरी (पंचायत समिती, यवतमाळ) येथे विठ्ठल-रुक्मिणी बालवारी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि भक्तिभाव रुजावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी तसेच वारकरी संप्रदायाची पारंपरिक वेशभूषा परिधान करून बालवारीचा मनमोहक देखावा साकारला. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीची आकर्षक वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य आणि फुगडी सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.यानिमित्ताने गावातून दिंडी व बालवारी काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात परिसर भक्तिमय झाला होता. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.कार्यक्रमास केंद्रप्रमुख दत्तात्रय गावंडे, मुख्याध्यापक देवराव डेबरे,. सुबोध बेलगमवार, सेवानिवृत्त शिक्षक . जयंत दिकोंडावार, . निखिल वाणे, सौ. बेबी पट्टे, सौ. सविता पाचपोर, सौ. संजीवनी बेलगमवार, सौ. सुलभा मुस्कंदे यांच्यासह शिक्षकवृंद, गावकरी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व गावकऱ्यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून आनंद व्यक्त केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि सांस्कृतिक मूल्यांची ओळख होऊन भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
