
सेवाकार्याचे कौतुकयवतमाळ, दि. ३१ जानेवारी —नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राला आज ब्राझील आणि बेल्जियम येथील दोन आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी भेट देऊन संस्थेच्या कार्याची पाहणी केली. डायट कॉलेजचे माजी प्राचार्य माननीय डॉ. प्रशांत गावंडे यांच्या पुढाकाराने ही भेट घडून आली.या वेळी बेल्जियमचे समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. फ्रेडरिक तसेच ब्राझीलच्या अर्थशास्त्र प्राध्यापिका डॉ. सिंथींया यांनी निवारा केंद्रातील कार्य, उपचारपद्धती, पुनर्वसन प्रक्रिया आणि सेवाव्रतींचे योगदान यांची माहिती घेतली. बेघर मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.डॉ. प्रशांत गावंडे यांनी इंग्रजी भाषेत फाउंडेशनच्या विविध प्रकल्पांची माहिती देत संस्थेची कार्यपद्धती समजावून सांगितली. यानंतर दूरदर्शन जिल्हा प्रतिनिधी आनंद कसंबे यांनी तयार केलेली नंददीप फाउंडेशनवरील माहितीपट पाहून विदेशी पाहुणे भारावून गेले.फाउंडेशनला नुकतेच मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल त्यांनी अभिनंदन व्यक्त केले असून या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.या प्रसंगी डायटचे माजी प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, डॉ. सुशील बत्तलवार, फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे, नंदिनी शिंदे, संजय बोरगावकर, बबन घोडेस्वार, गौरी बोटरे, निकिता, सविता मडावी, प्रिया बागडे आदी उपस्थित होते.नंददीप फाउंडेशनच्या वतीने या विशेष भेटीबद्दल डॉ. प्रशांत गावंडे यांचे आभार व्यक्त करण्यात आले असून, या पाहुण्यांच्या शब्दांनी सेवाव्रतींना नव्या उत्साहाची प्रेरणा मिळाल्याचे संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
