
सुसंस्कार विद्या मंदिरच्या चिमुकल्यांनी बेघर बांधवांच्या जीवनात आशेचा उजेड पेरत समाजातील माणुसकीचे सुंदर दर्शन घडविले.दरवर्षी सामाजिक विचाराने प्रेरित होऊन सुसंस्कार विद्या मंदिर, यवतमाळ येथे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यानंतर केवळ शैक्षणिकच नव्हे तर शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास घडविणे हा शाळेचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थीदशेतच समाजकार्याची आवड रुजली तर तीच भावना भविष्यात प्रेरणादायी ठरते, या विचारातून हा उपक्रम राबविण्यात आला.‘सामाजिक सेवा हीच ईश्वर सेवा’ या उक्तीप्रमाणे सिंघानिया नगर स्थित सुसंस्कार विद्या मंदिर शाळेतील इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी एस.व्ही.एम. अन्न बँक – ‘एक वाटी एक आशीर्वाद’ या सामाजिक उपक्रमांतर्गत समर्थ वाडी, न.प. शाळा क्र. १९, यवतमाळ येथील नंददीप फाउंडेशनद्वारे संचालित बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रास भेट दिली.या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी मनोरुग्णांच्या सहवासात काही क्षण घालवून त्यांच्या दैनंदिन जीवनशैली, शिस्तपालन, आरोग्यसेवा व निवारा व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. तसेच विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने गोळा केलेले तूरडाळ, तांदूळ व कणिक यांची भेट देऊन सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण केला.हा उपक्रम व्हर्सेटाईल एज्युकेशन व फायनान्शियल साक्षरता घटकांतर्गत राबविण्यात आला असून ‘एक वाटी – एक आशीर्वाद’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सहवेदना व समाजभान जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.या प्रेरणादायी उपक्रमामागे संस्थेचे सचिव संजय कोचे व मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी मनोरुग्णांच्या सहवासात राहून त्यांच्या जीवनासाठी झटणाऱ्या नंददीप फाउंडेशनचे संचालक संदीप शिंदे व नंदिनी शिंदे दांपत्य तसेच संपूर्ण कर्मचारीवर्गाचे मनःपूर्वक कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.या सामाजिक उपक्रमास संस्थेचे सचिव संजय कोचे, मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे, नंददीप फाउंडेशनचे संचालक संदीप शिंदे व नंदिनी शिंदे, शाळेतील शिक्षक-शिक्षिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
